जन्म जसा अटळ आहे तशी निवृत्तीही अटळ असतेच !! निवृत्तीनंतरचे जीवन तणाव विरहित असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. पण त्यासाठी गरज असते योग्य आर्थिक नियोजनाची. पण तारुण्यात असताना नेमकी हीच बाब आपण दुर्लक्षित करत असतो व मग निवृत्ती जवळ आली की उपलब्ध वेळेचे नियोजन कसे करायचे आणि महिन्याचा खर्च कसा plan करायचा हा मोठा प्रश्न बहुतांशी सर्वाना पडतो!!

यासाठी आत्ता जे तरुण आहेत त्यांनी तसेच येत्या ५ / १० वर्षात जे निवृत्त होणार आहेत त्या सर्वांनी खालील मुद्दे वाचावेत व आपले नियोजन सुरु करावे हि प्रामाणिक इच्छा आहे !!

1. आजारपणातील खर्चाची तरतूद
निवृत्तीनंतरच्या सुरूवातीच्या वर्षांमध्ये तब्बेतीच्या कूरबूरी फारशा नसतात. परंतु वय जसजसे वाढत जाते तसतशा आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर यायला लागतात. त्यावेळेस औषधोपचार, हॉस्पीटलचा खर्च यासारख्या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. आयुष्यभर काटकसर करून जमा केलेला पैसा आजारपणात खर्च करण्यात काहीच हशील नाही. त्यासाठी कुटुंबाचा एक आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. निवृत्तीआधीच त्याचे नियोजन केले तर कमी हफ्त्यात जास्त चांगल्या सुविधा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे. त्याबरोबरच गंभीर आजारांसाठीचासुद्धा विमा घेणे गरजेचे आहे. उतार वयात उद्भवणाऱ्या अनेक गंभीर आजारपणांचा खर्च या विम्यातून भागवला जाऊ शकतो. यातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे रिटायरमेंट फंडातील काही रक्कमेची औषधोपचार इत्यादी खर्चांसाठी तरतूद आधीच करून ठेवणे.

2. रिटायरमेंटसाठीची बचत
बहूतांश भारतीयांच्या आर्थिक नियोजनाच्या यादीत निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील आर्थिक गरजांचा विचारच केलेला नसतो. बचत करताना मुलांची शिक्षणं, त्यांची लग्न कार्ये आणि इतर काही कौटूंबिक खर्च इतपतच आर्थिक नियोजनाचा विचार होतो. परंतु इतर गरजांइतकंच निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा विचार हासुद्धा एक महत्वाचा भाग आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग करताना सद्य परिस्थितीतील जीवनशैली, दरमहिन्याचा खर्च, भविष्यातल्या आपल्या योजना, वाढती महागाई यासर्वांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपल्या मासिक उत्पन्नातून किमान 20 टक्के रक्कमेची रिटायरमेंट फंडासाठी बचत केली पाहीजे. नंतरच्या काळात यात वाढ करत नेणे अधिक फायद्याचे. यात प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आणि आवश्यकतेनुसार ही रक्कम वेगवेगळी असेल.

3. निवृत्तीच्या आधी आणि नंतरची गुंतवणूक
फक्त बचत करून निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या आर्थिक गरजा पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी रिटायर होण्याआधीच तरूण वयातच गुंतवणूकीची सवय लावणे जास्त योग्य. त्यामुळे निवृत्तीच्या वेळेस तुमच्या हाती चांगला निधी उपलब्ध झालेला असेल. त्याबरोबरच निवृत्तीनंतर हाती आलेला पैसादेखील योग्य रितीने गुंतवणे खूप महत्वाचे आहे. यामुळे निवृत्तीनंतरच्या जीवनशैलीची, पर्यटनाची आणि इतर गरजांची काळजी घेतली जाईल. यासर्व गोष्टींसाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेणे केव्हाही श्रेयस्करच. उतारवयातील आर्थिक गरजांची तरतूद तरूणपणातच करायची असते.

व हे सर्व नियम कसे आचरणात आणावयाचे हे जाणण्यासाठी एखाद्या तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेवूनच आपले नियोजन करायचे हे आजचा गणेश जयंतीच्या मुहूर्तावर ठरवूया !!

अभिप्राय द्या!