यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांबाबत पुढील तीन शक्‍यता वर्तविल्या जात आहेत. 
1) सध्याच्या एनडीए सरकारला स्पष्ट बहुमत मिळणे ः जर असे झाले तर त्यांनी गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या अनेक चांगल्या धोरणात्मक निर्णयांचा (उदा. जीएसटी, बुडित कर्जे कायदा, आर्थिक शिस्त आदी) पाठपुरावा त्यांना विनाअडथळा करता येईल. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून अधिक वर जायला ही सर्वांत चांगली बाब राहील. 
2) विरोधी पक्षांचे स्थिर सरकार येणे ः असे झाले तरीसुद्धा शेअर बाजार त्याला पसंती देऊ शकेल. कारण “जीएसटी’सारखी धोरणे व्यवस्थित राबवायला आणि त्यात सुधारणा करायला याचा फायदा होईल. 
3) त्रिशंकू स्थिती निर्माण होणे ः कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन “खिचडी सरकार’ बनणे, हे शेअर बाजाराच्या दृष्टीने सर्वांत प्रतिकूल ठरेल. कारण अशा नेत्यांचे लक्ष देशाच्या प्रश्‍नांपेक्षा त्यांची खुर्ची सांभाळण्याकडे जास्त राहील. अस्थिरता ही शेअर बाजारासाठी धोक्‍याचा इशारा असते. 
गुंतवणूकदारांनी काय करावे? 
————————- 
1) सावध गुंतवणूकदारांसाठी ः ज्यांना इक्विटीची जोखीम घ्यायची नाही, त्यांनी “ऍसेट ऍलोकेशन’ करणारे बॅलन्स्ड ऍडव्हांटेज, इक्विटी सेव्हिंग्ज किंवा डायनॅमिक ऍसेट ऍलोकेशन करणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी. यात बाजाराच्या मूल्यांनुसार या योजनेतील इक्विटी, आर्बिट्राज आणि डेट प्रकारचे प्रमाण फंड व्यवस्थापक नियमितपणे बदलत राहतात. यायोगे या योजनांवर बॅंक ठेवींपेक्षा जास्त दराने स्थिर परतावा मिळू शकतो. आयसीआयसीआय बॅलन्स्ड ऍडव्हांटेज, एसबीआय डायनॅमिक इक्विटी यांचा विचार करायला हरकत नाही. यात एकरकमी पैसे गुंतविता येतील. 
2) मध्यम जोखीम घेऊ शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ः हायब्रीड इक्विटी प्रकारात किंवा लार्ज कॅप योजनांमध्ये सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅनद्वारे (एसटीपी) गुंतवणूक करता येईल. यासाठी प्रिन्सिपल, एचडीएफसी यांचे हायब्रीड, टाटा रिटायरमेंट अशा योजनांचा विचार करता येईल. 
3) आक्रमक गुंतवणूकदारांसाठी ः ज्यांना मूल्यातील तात्पुरती घट चालते, त्यांना मल्टी कॅप, मिड आणि स्मॉल कॅप योजनांचा विचार करता येईल. 2018 मधील शेअरच्या भावातील घट मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये सर्वांत जास्त होती. एसबीआय स्मॉल कॅप, ऍक्‍सिस मिड कॅप अशा योजनांचा विचार करता येईल. 
ज्यांना अजून “ईएलएसएस’ प्रकारच्या योजनांमध्ये “80-सी’खालील करबचत करण्यासाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांना अशी रक्कम यापुढील आठ आठवड्यांत “एसटीपी’ने गुंतवून आपली जोखीम कमी करता येईल. 

अभिप्राय द्या!

Close Menu