शेअर बाजारातील अस्थिरतेचा गुंतवणुकीवर कमीतकमी नकारात्मक परिणाम व्हावा मात्र त्याच वेळेस इक्विटीचा फायदा मिळावा यासाठी डायनॅमिक इक्विटी फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फंडाचे स्वरूप डेट व इक्विटी असे मिश्र असते. डायनॅमिक इक्विटी फंड बाजारमूल्य वाढले की इक्विटीमध्ये कमी प्रमाणात गुंतवतात. याउलट बाजारमूल्य घसरले की इक्विटीतील गुंतवणूक वाढवतात. यातील इक्विटीचे प्रमाण हे मोजणीच्या पद्धतीनुसार बदलते.
डायनॅमिक फंडाची वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाते. डायनॅमिक इक्विटी फंड पोर्टफोलिओ संतुलित करतात. त्यामुळे प्रथमच इक्विटीत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी हे फंड कमी जोखमीचे असतात. डायनॅमिक फंडांकडे बऱ्याच प्रमाणात रोकड असते. त्यामुळे बाजार सक्षम असताना या फंडांची कामगिरी उत्साहवर्धक नसते. बाजारात करेक्शन आल्यास डायनॅमिक इक्विटी फंडांच्या निव्वळ मत्तामूल्यात (एनएव्ही) इक्विटी फंडाच्या तुलनेत फारशी घसरण होत नाही. या फंडांमध्ये चढउतारही कमी दिसून येतो तसेच परतावाही कमी असतो. बाजारमूल्याबाबत सावध असलेल्यांसाठी डायनॅमिक इक्विटी फंड अधिक योग्य असतात.
 कररचना
या फंडाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या फंडावर इक्विटी फंडाप्रमाणेच कर लागू होतो. फंडाच्या गुंतवणूक पद्धतीनुसार, इक्विटी व आर्बिट्राज हा घटक कॉर्पसच्या 65 टक्के असतो तर उरलेली गुंतवणूक डेट प्रकारात केली जात. यामुळेच इक्विटी फंडाप्रमाणे कररचना असणे शक्य होते. यामुळे डायनॅमिक इक्विटी फंडात एक वर्षाहून अधिक काळ गुंतवणूक कायम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना दीर्घमुदत भांडवली लाभ कर (एलटीसीजी) भरावा लागत नाही, ज्यामुळे त्यांची गुंतवणूक करमुक्तच होते.

अभिप्राय द्या!