नावाप्रमाणेच टर्म इन्श्युरन्समध्ये फक्त इन्श्युरन्स / संरक्षण येते. म्हणजेच युलिप किंवा एंडोमेंट प्रमाणे इन्श्युरन्स आणि गुंतवणूक असा प्रकार यात नसतो. त्यामुळे कमीत कमी प्रीमियममध्ये चांगला लाभ / कव्हर मिळणे शक्य होते. असे असले तरी, टर्म इन्श्युरन्स बद्दल अनेक समज -गैरसमज आहेत त्याचबरोबर इन्श्युरन्स घेताना अनेक चुका होतात. त्या टाळण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करूया.
प्रीमियम आणि मृत्यूनंतरचा फायदा
अगोदरच्या तुलनेत आता भारतात टर्म इन्श्युरन्सचे महत्व लक्षात येत आहे. मात्र आजही अनेकजण टर्म इन्श्युरन्सच्या फायद्याविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसते. टर्म प्लॅनमध्ये, पॉलिसी चालू असताना जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांना विम्याचे पैसे मिळतात मात्र पॉलिसीची मुदत संपूनही जर विमाधारक जिवंत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही हे आपल्याला माहिती आहे.
असे असले तरी, आयुर्विमा पॉलिसीकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याची आपल्याकडे प्रथा असल्याने मुदत संपल्यानंतर काहीतरी लाभ व्हावा या हेतूने अनेक जण इंश्युरन्स घेत असतात. ही बाब लक्षात घेऊन टर्म इंश्युरन्स मध्ये देखील ‘रिटर्न ऑन प्रीमियम’ हा पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या नेहमीच्या प्रीमियम पेक्षा अतिरिक्त शुल्क भरून हा लाभ घेता येतो. मात्र, मिळणारा लाभ आणि त्यावेळी असणारे त्या पैशाचे मूल्य लक्षात घेता हा चांगला पर्याय ठरू शकत नाही.
परिणामी, अतिरिक्त पैशांची गुंतवणूक शेअर्स, डिबेंचर्स, मुदत ठेव इ. प्रकारात केल्यास त्याचा चांगला लाभ मिळू शकतो.
विमा घेण्याची योग्य वेळ कोणती आणि विमा किती असावा
आज करे सो अब! या म्हणीप्रमाणे विमा घेण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसून सध्याच्या काळाचा विचार करता तो आजच घेणे शहाणपणाचे ठरू शकते.
सर्वसाधारणपणे जेंव्हा तुमच्या उत्पन्नावर तुमचे आई-वडिल किंवा पत्नी- मुले अवलंबून असतात अशावेळी विमा घेणे अत्यंत आवश्यक असते. तसेच जसजसे तुमच्या जबाबदाऱ्या वाढत जातील (मुलांचे शिक्षण, इतर खर्च) त्याप्रमाणे विमा संरक्षणाची मर्यादा देखील वाढविली पाहिजे.
विम्याचे संरक्षण/ कव्हर किती असावे याचा सर्वोत्तम फॉर्म्युला म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट. म्हणजे समजा, हरीशचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर हरीशकडे 1 कोटींचा टर्म प्लॅन असला पाहिजे.
एक की अनेक पॉलिसी
अनेकांचा एकाच पॉलिसीवर / कंपनीवर विश्वास नसल्याने ते एकाच प्रकारचा विमा दोन-तीन कंपन्यांकडून काढून घेतात. म्हणजे समजा हरीशला 1 कोटींचा संरक्षण विमा काढायचा असेल तर तो एका कंपनीकडून 50 लाख आणि दुसऱ्या कंपनीकडून 50 लाख किंवा 25-25-50 अशा प्रकारचे कॉम्बिनेशन साधून दोन किंवा तीन कंपन्यांकडून इंश्युरन्स काढला जातो. त्याला कारण म्हणजे एका कंपनीने क्लेम रिजेक्ट केला तर दुसऱ्या कंपनीकडून तो पास होईल.
मात्र, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की विशिष्ट नियमाचा आधार घेऊन एखादी कंपनी क्लेम नाकारत असेल तर दुसरी कंपनी देखील त्याच नियमाचा आधार घेणार आहे. परिणामी आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांना त्याचा त्रासच जास्त होणार आहे.
त्यामुळे, एका कंपनीचा एकच चांगल्या आर्थिक संरक्षणाचा विमा असणे उत्तम. त्यातूनही समाधानरूपी पर्याय म्हणून जास्तीत जास्त दोन योजनांपेक्षा पुढे जाऊ नये.