आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राने शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 2.05 कोटी कोटी शेअर बायबॅक करण्याचे ठरवले आहे. कंपनीकडून प्रतिशेअर 950 रुपयांप्रमाणे शेअर खरेदी केली जाणार आहे. कंपनी बायबॅकच्या माध्यमातून 1,956 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करणार आहे. टेक महिंद्राच्या संचालक मंडळाने 21 फेब्रुवारी रोजी बायबॅकला परवानगी दिली होती. प्रस्तावित योजनेसाठी 6 मार्च ‘रेकॉर्ड डेट’ निश्चित करण्यात आली आहे.
 
आज मुंबई शेअर बाजारात टेक महिंद्राचा शेअर 2.15 टक्क्यांच्या म्हणजेच 17.50 रुपयांच्या वाढीसह 829.90 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 81 हजार 472.39 कोटींचे बाजारभांडवल आहे. 
 
शेअर बायबॅक म्हणजे काय? 
शेअर बायबॅक म्हणजेच शेअर पुनर्खरेदी होय. शेअर बायबॅक करण्यामागे कंपनीची वेगवेगळी करणे असू शकतात, जसे की भागधारकांना त्यांचे पैसे (लोकांकडून उभारलेले भाग-भांडवल) परत करणे होय. शिवाय नजीकच्या काळात जर कंपनीच्या व्यवसाय विस्ताराच्या काही योजना नसतील तसेच कंपनीकडे अतिरिक्त निधी असेल तरी देखील शेअर बायबॅक केले जाते. कंपनीच्या शेअरचा भाव खूप खाली असेल असे  कंपनीला वाटल्यास कंपनी अशा पडलेल्या भावात पुनर्खरेदी जाहीर करून कंपनीतील स्वतःचा हिस्सा वाढवायचा प्रयत्न करते. यामुळे शेअरची बाजारातील किंमत देखील वधारण्यास सुरुवात होते. 

अभिप्राय द्या!