उद्या जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा केला जाईल. परंतु, बहुतेक कुटुंबांमध्ये आजही आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हा विषय पुरुषांच्या अखत्यारीत येतो. महिलेने लग्न करायचे नाही, असे ठरविले किंवा लग्नानंतर घटस्फोट झाला किंवा पतीचे अकाली निधन होऊन वैधव्य आले आणि त्यातच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पडली, तर संबंधित महिलेला खूप आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागते. आज भारतात 10 कोटींच्या वर महिला घटस्फोट, वैधव्य किंवा लग्न न झाल्याने एकट्या राहात आहेत. या पार्श्‍वभूमीवर महिलांनी आर्थिक नियोजन किंवा गुंतवणूक या विषयात वेळीच लक्ष घालण्याची गरज अधोरेखित होते.
महिलांनी आर्थिक नियोजन करणे का आवश्‍यक आहे, याची अजूनही बरीच कारणे आहेत. समान शैक्षणिक पात्रता व अनुभव असतानासुद्धा पुरुषांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत महिलांना मिळणारे वेतन हे साधारणपणे 30 टक्‍क्‍यांनी कमी असते, असे बोलले जाते. असे खरोखरच असेल, तर महिलांना जास्त प्रमाणात बचत आणि गुंतवणूक करणे आवश्‍यक आहे. “ग्लोबल वेज रिपोर्ट’नुसार भारतातील वेतनामध्ये असणारी ही तफावत जगामधील देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. “ग्लोबल इकॉनॉमिक फोरम’च्या “जेंडर गॅप’ अहवालानुसार, पुरुष-महिला समानतेच्या बाबतीत 144 देशांमध्ये भारत 108 व्या स्थानावर आहे. सर्वांत वरच्या स्तरावर अर्थात मोठ्या हुद्द्यांवरील सभासदांमध्ये महिलांची संख्या फक्त पाच टक्के आहे. भारतात साधारणपणे 20 टक्के कंपन्यांमध्ये संचालकपदावर एकही महिला नाही. दुसरे असे, की पुरुषांच्या तुलनेत महिला कमी वर्षे काम करतात. मुलांचा जन्म आणि संगोपन यासाठी बहुतेक महिला करिअरमध्ये काही महिने अथवा काही वर्षे “ब्रेक’ घेतात. पुन्हा कामावर रुजू झाल्यावर मात्र त्यांना काम सोडतांना असणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतनावर रुजू व्हावे लागते, असे काही वेळा दिसून येते.
महिलांसाठी गुंतवणुकीचे महत्त्व जास्त असण्याचे अजून एक कारण म्हणजे साधारणपणे महिला या पुरुषांपेक्षा जास्त वर्षे जगतात. त्यांचे आयुर्मान जास्त असते.
तात्पर्य, महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त बचत आणि योग्यरीतीने गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता आहे. येत्या महिला दिनाच्या निमित्ताने ही बाब लक्षात घेऊन सक्रिय सहभागासाठी पाऊल उचलले पाहिजे, असे आवर्जून सांगावेसे वाटते.

अभिप्राय द्या!

Close Menu