एप्रिल 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली होती, पण “निफ्टी’ची हालचाल सप्टेंबर 2013 मध्येच सुरू झाली होती. 5200 अंशांच्या पातळीवरून नोव्हेंबरपर्यंत तो 6300 अंशांच्या पातळीपर्यंत वधारला होता. नोव्हेंबर 2013 पासून फेब्रुवारी 2014 पर्यंत “निफ्टी’ 6000 ते 6300 या पातळीमध्येच खेळत राहिला. याचा अर्थ असा, की निवडणुकीच्या निकालांचा अंदाज बाजार घेत होता. मग मार्च महिन्यापासून त्याला दिशा मिळाली आणि “निफ्टी’ 6300 च्या पुढे वाटचाल करू लागला. या वेळीसुद्धा ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2018 मध्ये “निफ्टी’ 10,000 अंशांच्या पातळीवरून 11,000 अंशांच्या पातळीपर्यंत वाढला आहे. त्यानंतरचा पुढील तीन-चार महिन्यांचा कालावधी पाहिला, तर तुमच्या लक्षात येईल, की त्यामध्ये पण साम्य आहे. नोव्हेंबर 2018 पासून आतापर्यंत 10,500 ते 11,100 या पातळीमध्येच “निफ्टी’ खेळत आहे. 
 
संधी गमावू नये… 
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील वेळी जेव्हा “निफ्टी’ला दिशा मिळाली होती, त्यानंतर 6300 वरून “निफ्टी’ पुढील एका वर्षात 9000 अंशांच्या पातळीपर्यंत वधारला. या वेळी पण असे काही होऊ शकते आणि त्यामागील एक महत्त्वाचे कारण असे, की गेल्या एका वर्षात बाजार हा जास्तकरून मंदीच्या भीतीच्या वातावरणातून चालला आहे. गुंतवणूकदार या विचारांनी त्रासले आहेत, की आमचा पोर्टफोलिओ हा नफ्यात कधी दिसणार? एक वर्षाच्या मंदीच्या प्रवासातून जेव्हा बाजार बाहेर पडेल, तेव्हा त्याचा पुढचा जो कालावधी असेल तो नक्कीच सकारात्मक असेल. असे आपण यापूर्वीसुद्धा म्हणजेच 2015-16, 2011-12, 2008-09 या वर्षांनंतर पाहिले आहे. जे मागील वेळेला घडले, तसेच पुन्हा एकदा घडले, तर गुंतवणूकदारांना एक मोठी नवी संधी मिळेल. ही संधी कोणीही गमावता कामा नये, असे मला वाटते. 
जेव्हा संधी येते, तेव्हा ती काही फोन करून येत नसते, हे लक्षात ठेवा. “निफ्टी’च्या सकारात्मक वाटचालीबरोबर तुमचीदेखील सकारात्मक वाटचाल होऊ शकते. 11,100 या पातळीच्या वर “निफ्टी’ चालायला लागला तर समजावे, की बाजाराला “तेजी’ची चाहूल लागत आहे. त्यापुढे “निफ्टी’ची वाटचाल त्याचा पुढील लक्ष्याकडे असेल आणि ते लक्ष्य पुढील दोन वर्षांत 13,800 अंशांच्या पातळीचे असू शकते.

अभिप्राय द्या!