घरी आल्यावर बाबांचा पडलेला चेहरा बघून शशांकने विचारले…
बाबा, काय झालंय? तुम्ही एवढ्या चिंतेत का दिसताय?
बाबा: अरे  बॅंकांच्या व्याजाचे दर दिवसेंदिवस कमीच होत चाललेत. यावेळेस तर मला “एफडी’वर फक्त वार्षिक 7 टक्केच व्याज मिळालं. बेटा, आता मात्र दर महिन्याला मिळणाऱ्या पैशांत नक्कीच आमचा खर्च नाही भागणार. आता मात्र आम्हाला तुझ्याकडून दर महिन्याला आर्थिक मदत नक्की लागणार.

शशांकच्या बाबांनी निवृत्त झाल्यावर आपली सारी पुंजी बँक FD मध्ये ठेवली आहे व त्याच्या व्याजावर त्यांचा आजपर्यंत उदरनिर्वाह व्हायचा.

वरील संभाषणांतून आपल्याला असे जाणवते, की बॅंकेच्या “एफडी’चे व्याजदर दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि आपल्याला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या किमती मात्र वाढत आहेत. कारण फक्त एकच, महागाईचा दर! जर आपण आपले पैसे असेच बॅंकेत “एफडी’च्या रूपात ठेवले, तर एका मोठ्या कालावधीनंतर आपल्याला दर महिन्याला लागणाऱ्या पैशांत आणि आपल्याला दर महिन्याला मिळणाऱ्या पैशांत खूप मोठी तफावत दिसेल.

ही परिस्थिती जर बदलायची असेल तर एक पर्याय आहे. त्यात थोडी जोखीम आहे, पण जर आपण गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर यात फारशी जोखीम नाही, असे दिसून येईल. तो पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स्ड फंडातील गुंतवणूक. जर आपण “एफडी’मधील पैसे बॅलन्स्ड फंडात ठेवले आणि “सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ (एसडब्ल्यूपी) घेतला तर आपल्याला दरमहा उत्पन्नही मिळते आणि एका मोठ्या कालावधीनंतर आपली गुंतवणूक वाढण्यासही मदत होते. कारण या फंडातील काही भाग इक्विटी म्हणजे शेअर बाजारात गुंतविला जातो आणि काही भाग हा रोखे (डेट) बाजारात गुंतविला जातो. या गुंतवणुकीचा अजून एक फायदा म्हणजे आपल्याला दरमहा मिळणाऱ्या रकमेवर करही भरावा लागत नाही. सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांचे बॅलन्स्ड फंड असतात. पण त्यातील चांगला फंड कोणता, जो जास्तीत जास्त आपल्याला परतावा देऊ शकेल, हे जाणून घेण्यासाठी एखाद्या अनुभवी सल्लागाराचा सल्ला घेऊनच यात गुंतवणूक करावी. कारण आता काळानरूप आपले विचार बदलायची गरज आहे, थोडीफार जोखीम घ्यावी लागेल. त्यासाठी नव्या पर्यायाचा विचार करायला हवा.